Inauguration of Millet Festival by Minister of Commerce Abdul Sattar
पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मिलेट महोत्सवाचे उद्घाटन
पोषक तृणधान्य खरेदीसह महोत्सवातील कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे आवाहन
पुणे : आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या पौष्टिक तृणधान्याचा नागरिकांनी दैनंदिन आहारामध्ये समावेश करुन आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवावे, असे आवाहन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट येथे आयोजित ‘मिलेट (पौष्टिक तृणधान्य) महोत्सव-२०२४’ च्या उद्घाटन प्रसंगी श्री. सत्तार बोलत होते. यावेळी पणन संचालक केदारी जाधव, उपसंचालक मधुकांत गरड, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, उपसरव्यवस्थापक राजेंद्र महाजन आदी उपस्थित होते.
मंत्री सत्तार म्हणाले, येणाऱ्या पिढीला तृणधान्याचे महत्व कळणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्राहकांमध्ये पौष्टिक तृणधान्याचा प्रचार, प्रसिद्धी करणे गरजेचे आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने सामान्य ग्राहकांना तृणधान्याच्या फायद्यांची माहिती देण्यात यावी. ग्राहकांनी मिलेट महोत्सवाला भेट देऊन खरेदीसह विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, नागरिकांनी रासायनिक प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळावे. निरोगी राहणे ही प्रत्येकाची मालमत्ता आहे. तृणधान्याचे प्रकृतीवर चांगले परिणाम होत असून त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी उत्तम आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले. अशा उपक्रमांमध्ये सातत्य ठेवण्यासाठी मिलेट महोत्सव सुरू करण्यात आला आहे. तृणधान्य महोत्सवाची ही संकल्पना खूप चांगली आहे. महोत्सवात सर्वसामान्य ग्राहकांना स्टॉलच्या माध्यमातून विविध तृणधान्यचे पदार्थ खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळेल, असेही श्री. सत्तार म्हणाले.
महिला बचत गटाचे उत्पादन वाढावे व त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत व्हावा यासाठी त्यांना कायमचे स्टॉलच्या माध्यमातून महापालिकास्तरावर बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न केले जातील. महिला बचत गटांना कर्ज घेताना, व्यवसाय करताना काही अडीअडचणी, समस्या असल्यास त्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
प्रास्ताविकात श्री. कदम म्हणाले की, तृणधान्याची ग्राहकामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहेत. या महोत्सवात मिलेट उत्पादने, मूल्यवर्धीत प्रक्रिया उत्पादने, आरोग्यविषयक महत्त्व याविषयी नामांकित तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, खरेदीदार- विक्रेते संमेलन आदी कार्यक्रम होणार असून ग्राहकांनी मिलेट खरेदीसह विविध कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी मंत्री सत्तार यांनी विविध स्टॉलची पाहणी करून तृणधान्यच्या जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या मिलेट बाईक रॅलीस हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. सारस बाग चौक- एलबीएस रोड-म्हात्रे ब्रीज-नळ स्टॉप-कर्वे रस्ता- डेक्कन-टिळक रोडमार्गे गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. तर दुसऱ्या रॅलीचा सारस बाग चौक -शिलाई चौक-स्वारगेट-सेव्हन लव्ह चौक- गांगाधाम चौक-बिबवेवाडी चौक, महेश सोसायटी-भारती विद्यापीठ- पुणे सातारा रोडमार्गे गणेश कला क्रीडा रंगमंच येथे समारोप करण्यात आला.
२१ जानेवारी पर्यंत पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात राज्याच्या विविध भागातून तृणधान्य उत्पादक, तृणधान्य प्रक्रियामध्ये कार्यरत असणारे बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्ट अप कंपन्या यांनी विविध तृणधान्य उत्पादनांचे स्टॉल लावले आहेत. त्या माध्यमातून ग्राहकांना अस्सल ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा, कोद्रा ही तृणधान्ये व यापासून तयार करण्यात येणारा ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली-मिक्स, रागीचा डोसा मिक्स आदी नाविण्यपूर्ण उत्पादने थेट उत्पादकांकडून प्रदर्शन तसेच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मिलेट महोत्सवाचे उद्घाटन”